fbpx

औरंगाबाद : कुलगुरूंनी भाजीपाला विकला

औरंगाबाद : नुकतेच सेवानिवृत्त झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपला तरी त्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा संपलेला नाही. कुलगुरूंच्या बंगल्यातील सामानाची तपासणी करण्याची मागणी होत असतानाच विद्यापीठाच्या आवारात पिकवलेल्या सेंद्रीय भाजीपाल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना राबवून भाजीपाला पिकवला जात होता. हा भाजीपाला विद्यापीठाच्या वाहनातून दर आठवड्याला बाहेर नेऊन विकला जात होता, त्याच्या पैशाचे काय ? असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केला आहे.

भाजीपाल्याच्या व्यवहारासाठी माजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या पत्नी नलिनी चोपडे यांनी पुढाकार घेतल्याचे संघटनेने म्हटले आहे. नवनियुक्त कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले आहे. डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या खर्चातून कुलगुरू बंगल्याच्या आवारात सेंद्रीय भाजीपाला पिकवण्यात आला. हा भाजीपाला पुणे व औरंगाबाद येथे विकण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोरीकर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वाहनातून भाजीपाल्याची वाहतूक करण्यात आली. अशाप्रकारे व्यवसाय करता येत नसताना त्यांनी कुलगुरूपदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळवला . त्याबाबत चौकशी समिती नेमून प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

– भाडे वसूल करा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे तीन जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतरही चार-पाच दिवस त्यांचे साहित्य वाहून नेण्यासाठी व कुटुंबासह पुण्याला जाण्यासाठी विद्यापीठाची वाहने वापरली गेली; तसेच विद्यापीठाचे कर्मचारी कुटुंबाच्या दिमतीला होते. भाडे म्हणून माजी कुलगुरूंनी दिलेल्या रकमेची पोचपावती दाखवावी, अशी मागणीही केली आहे.