औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी पुणे येथे बनवला उपग्रह

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारा आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज-२०२१ अंतर्गत मार्टिन ग्रुप यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील मुलांसाठी उपग्रह बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण मागील आठ दिवसापासून सुरू होते. यात प्रत्यक्ष उपग्रह बनवण्याची कार्यशाळा मंगळवारी (दि. १९) पुणे येथे झाली. पुणे येथील कार्यशाळेत औरंगाबाद महापालिकेच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एक उपग्रह बनविला आहे.

पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, रवींद्र निकम व उपायुक्त सुमंत मोरे यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुणे येथील कार्यशाळेत मनिषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली २३ उपग्रह बनविण्यात आले. संपूर्ण देशभरात कार्यशाळा सुरू असून १०० उपग्रह बनविण्यात येणार आहे. हे उपग्रह रामेश्वरम येथील संस्थेमध्ये शास्त्रज्ञांमार्फत तपासणी करून रामेश्वरम येथूनच ७ फेब्रुवारी रोजी हेलियम बलूनद्वारे अवकाशात प्रक्षेपित केले जाणार आहे.

हे शंभर उपग्रह वेगवेगळ्या केसमध्ये फिट केलेले असतील. यासोबत पॅराशुट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम व लाइव्ह कॅमेरा जोडलेला असेल. अवकाशातून प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साइड आणि अंतराळातील इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची जागतिक विक्रम, आशिया विक्रम आणि इंडिया विक्रम अशी नोंद होणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना तीन प्रशस्तीपत्र देखील मिळणार आहेत. पालिका विद्यार्थ्यांना सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, प्रकल्प समन्वयक शशिकांत उबाळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसोबत पुणे येथील कार्यशाळेत शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, मुख्याध्यापक डॉ. संपत इधाटे, उर्मिला लोहार, संगीता ताजवे, सुरेखा महाजन, रश्मी होन्मुटे, आशा पुरी, वैशाली देशमुख, सुनील हिरेकर यांनी देखील सहभाग नोंदवला.

मनपा शाळेतील या विद्यार्थ्यांचा सहभाग
या उपक्रमात पालिका केंद्रीय माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी मयुरबन कॉलनी या शाळेतील सोनाली यादव, सुरज जाधव, विशाल वाहुल, गुलनाज सय्यद, पालिका केंद्रीय माध्यमिक विद्यालय मुकुंदवाडी या शाळेतील राणी चोपडे व नंदिनी मोठे, माध्यमिक विद्यालय एन-7 सिडको या शाळेतील प्रतिमा म्हस्के व साहिल केदारे आणि केंद्रीय माध्यमिक विद्यालय हर्सूल येथील इर्शाद समशेर खान व रुपाली गायकवाड हे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या