औरंगाबाद पोलिसांचा निर्णय नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा!

औरंगाबाद : औरंगाबाद पोलीस प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी या संबंधीचे पत्रक काढले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलीस आयुक्तांचा हा निर्णय शहरातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे म्हणावे लागेल.

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १२९ प्रमाणे दुचाकी स्वार आणि त्याचा सहप्रवासी यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर वाहतूक विभागाच्या वतीने ५ मे पासून हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, सध्या राज्य सरकारच्या ‘ब्रेक दे चेन’ नियमावलीमुळे बाजारपेठा बंद आहेत. अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. कोरोना रुग्ण संख्येत झालेली वाढ पाहता, प्रत्येक भागामधील एकाना-एका घरातील व्यक्ती आजारी आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटलला चकरा माराव्या लागत आहेत. आणि या सर्वात ही हेल्मेट सक्ती म्हणजे ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’ असाच काहीचा प्रकार आहे.

हेल्मेट हे नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर करण्याला कोणाचाच विरोध नाही. हेल्मेटचा वापर व्हायलाच हवा. मात्र, सध्याची परिस्थिती हेल्मेट सक्ती करण्यासारखी नाही. किंवा सामान्य नागरिकांची तशी माणसिकताही नाही. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्ती केल्यास आधीच त्रस्त असणाऱ्या नागरिकांच्या ‘जखमेवर मीठ चोळण्या’चाच प्रकार म्हणावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या