औरंगाबादमध्ये दगडफेकीत 3 पोलीस जखमी

औरंगाबाद : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली. गोदावरी शाळा, सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर येथे आज सकाळी जमावकडून दोन वाहने पेटवण्यात आली व रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मारहाणदेखील करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा, प्रात्याक्षिक रद्द केले आहे. पोलीस आयुक्तांनी कुलसचिवांशी चर्चा करून रद्द करण्याची विनंती केली होती. यावर परीक्षा विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच प्रशासकीय कामकाज ही बंद करण्यात आल आहे. शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा, बहुतेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.