‘या’ कारणामुळे पत्नीनेच दिली होती हत्येची सुपारी

औरंगाबादमध्ये काल बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. होळकर यांची पत्नी भाग्यश्री होळकर हिनेच या हत्येची सुपारी दिली होती. पती जितेंद्र सतत चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळेच त्यांची हत्या घडवून आणल्याची कबुली भाग्यश्री होळकरने दिली आहे.

औरंगाबाद जिल्हयातील शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक असणारे जितेंद्र होळकर हे काल पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले होते. मारेकऱ्यांनी जितेंद्र यांना खुर्चीवर बसवून, त्यांचे हातपाय बांधून त्यांना ठार मारले होते. त्यांच्या उजव्या हाताचे बोट कापण्यात आले होते. हत्येमागील कारण स्पष्ट होत नसल्याने पोलिसां समोर हत्येचा उलगडा करणे आव्हान झाले. मात्र, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या प्रकरणातील मारेकऱ्यांना आणि हत्येच्या सूत्रधाराला अटक केली आहे