औरंगाबाद मनपाची ७७ कोटींची मागणी मिळाले फक्त सव्वा कोटी!

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली तरी प्रशासनस्तरावर तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने सुमारे ८०० कंत्राटी कर्मचारी-डॉक्टरांना ऑगस्ट महिन्यापर्यंत नियुक्ती दिली आहे. त्यांच्या वेतनावर महिन्याला सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तसेच बाल कोविड केअर सेंटर उभारणे, साहित्य खरेदी, जुनी बिले देण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ७७ कोटी ७३ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. पण केवळ सव्वा कोटी रुपये मिळाले. दरम्यान आता १९ कोटी रुपये तातडीने मिळावेत, असा नवा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात चाचण्या करणे, बाधित नागरिकांवर उपचार करणे, लसीकरण अशी कामे महापालिकेतर्फे केली जात आहेत. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून महापालिकेला आत्तापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत ३७ कोटी ३६ लाख, तर जिल्हा नियोजन समितीमार्फत १० कोटी १२ लाख असा ४७ कोटी ४८ लाख रुपये निधी मिळाला आहे. असे असले तरी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे रुपयांचे देणे आहे.

दोन आठवड्यापूर्वी महापालिकेने आगामी तीन महिन्यांसाठी ७७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. पण महापालिकेला गेल्या आठवड्यात केवळ सव्वा कोटी रुपये मिळाले. त्यामुळे प्रशासनाने नवा प्रस्ताव तयार केला असून, १९ कोटी रुपयांच्या मागणीचा हा प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP