औरंगाबाद महानगरपालिकेचा १२७४ कोटीचा अर्थसंकल्प सादर

aurangabad budget

औरंगाबाद: महानगरपालिकेचा ३६ वा अर्थसंकल्प आज माननीय जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त यांनी स्थायी समिती समोर सादर केला. आयुक्तांनी प्रारंभीची शिल्लक ३४ कोटी २२ रुपये असलेला हा अर्थसंकल्प १२७४ कोटी ७० लाख ७२ हजार जमा आणि १२७४ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सभापतीना सादर केला.

नवीन रस्ते बांधणीसाठी २०७ कोटी ५ लाख रुपये तरतूद करण्यात आली. मनपाने स्वच्छतेसाठी शहरातील कचरा प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेतलेले नसून शासनाने दिलेल्या निधीवर अवलंबून राहत महापालिकेने बचत गटांमार्फत साफसफाई, स्वच्छ शाळा-महाविद्यालयांसाठी बक्षीस योजना, सॅनेटरी नॅपकिनची स्वतंत्र विल्हेवाट, कचऱ्याच्या वाहनांना जीपीआरएस यंत्रणा बसविणे, सफाई कामगारांना बूट, ग्लोज देणे, झोननिहाय रॅम्प तयार करणे, लहान स्विपिंग मशीन खरेदी, ट्रॅक्टर लोडर खरेदी आदींसाठी फक्त २८ कोटी ३८ लाखांची तरतूद केली आहे आणि सर्वात जास्त तरतूद ही प्रशासकीय खर्चावर केली असून २०१७-१८ या आर्थिक वर्षातील प्रशासकीय खर्च २२० कोटी ५५ लाख, तर २०१८-१९ मधील खर्च २६५ कोटी प्रस्तावित करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच २३५ कोटी खर्च होतील व अग्निशमन कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी २५ लाख, वैद्यकीय बिलांसाठी ७५ लाख, अभिलेख खर्च ५० लाख, अतिक्रमणांसाठी घेतलेला पोलीस बंदोबस्त ५० लाख, कार्यालयातील विद्युत बिल ३ कोटी ५० लाख, इंधन खर्च ५ कोटी ५० लाख, वाहनांची देखभाल १ कोटी ५० लाख, आऊटसोर्र्सिंग कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी १२ कोटींची तरतूद केली आहे. पाणी पुरवठा महसुली खर्चापोटी रु.७९.९० कोटीची तरतूद केली आहे.

पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सर्व कर्ज परतफेडीसाठी या अर्थसंकल्पात ५५ कोटीची तरतूद केली आहे. दिव्यांगासाठी ९,५०,००,०००/- तरतूद केली आहे. हिमायतबाग येथे जैवविविधता पार्क उभारणे, हर्सूल येथील जांभूळवन येथे आॅक्सिजन पार्क उभारणे, बॉटनिकल गार्डन येथे खेळणी, बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक उभारणे, हर्सूल तलाव येथे नौकायन सुरू करणे, खुले जीम, स्वामी विवेकानंद उद्यानात साहसी खेळांसाठी वास्तू उभारणे आदी कामांसाठी १४ कोटी ५५ लाखांची आर्थिक तरतूद करण्यात आली. तसेच शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रत डायलसिस सेन्टरउभारण्यासाठी २५ लाख, येक्सरे मशीन खरेदीसाठी ,पँथॉलॉजी लँब सुरू करण्यासाठी , फिरते आरोग्य सेवा केंद्रासाठी प्रत्येकी रुपये ५० लाख व डेन्टल चेअर खरेदी करण्यासाठी १० लाख आणि सर्व सोयी युक्त रुग्ण वाहीका खरेदीसाठी ७० लाख इत्यादीचा समावेश आहे. तर महिला व बालकल्याण विभागासाठी रु.६.०० कोटीची तरतूद केली आहे.क्रीडा विभागातील क्रीडा साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी रु ०१.००लक्ष, मनपाची क्रीडागंन दुरुस्त करण्यासाठी रू ५०.०० लक्षची विशेष तरतूद केली आहे. मैदाने विकसित करण्यासाठी रु ५०.०० लक्षची तरतूद केली आहे. मनपाच्या नाट्यगृहाच्या अनुक्रमे रु २५.०० लक्ष तसेच जिल्हा वार्षिकयोजनेमधून संत एकनाथ रंगमंदिर नूतनीकरणासाठी रु.२.०० कोटीची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी रु.१,००,००,०००/- इतकी तरतूद केली आहे. यावेळी सभागृहातील सदस्यांनी अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी केली. सभापतींनी ही मागणी मान्य करीत लवकरच स्थायी बैठक घेऊन अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट केले.