औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा- धनंजय मुंडे

औरंगाबाद- कचरा प्रश्नावरून औरंगाबाद मध्ये आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले होते. तसेच शहरातील नागरिक कचऱ्यामुळे त्रस्त आहेत. दरम्यान, औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

औरंगाबाद मधील कचरा प्रश्नाला महानगरपालिका जबाबदार असून या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करुन महापालिका बरखास्त केली पाहिजे. स्वच्छ भारत, स्मार्ट सिटीचे गोडवे गाणाऱ्या सरकारचे हे खूप मोठे अपयश आहे. असे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादमध्ये कचरा टाकण्यावरून आंदोलन पेटले असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. यावेळी जमावाकडून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांच्या दोन गाड्यांवरही दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. औरंगाबाद मध्ये कचरा प्रश्न चांगलाच पेटला असून नागरिक सरकार प्रती रोष व्यक्त करत आहेत.

काय आहे प्रकरण

नारेगाव येथून कचरा डेपो हलवावा ही मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू यावर कोणताही उपाय करण्यात आलेला नाही. खासदार आणि महापौर व इतर पदाधिकां-यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. समांतर पाणी पुरवठा योजना राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासनाकडून करून घेण्याऐवजी खाजगी कंपण्याच्या घशात ही योजना घालण्याचे उद्योग खासदारांनी चालविले आहेत. आयुक्तापासून ते थेट सर्वौच्च न्यायलयाने व इतर सर्व जबाबदार यत्रणांनी ही योजना खाजगी कपंणीना देऊ नये असे सांगितलेले असतानाही खासदार ऐकत नाहीत.