औरंगाबाद मनपा जोरात; एकाच दिवसात तब्बल कोटींमध्ये झाली वसूली!

AMC

औरंगाबाद : गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर खडखडाट निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचा थेट परिणाम कर वसुलीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिस्थिती सुधारत आहे तसतसे करवसुलीच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. सोमवारी एकाच दिवसात महापालिकेने पावणेदोन कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे लवकरच मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे बोलले जात आहे.

करवसुलीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले होते. त्यातच कोरोनामुळे गत २ वर्षात पालिकेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या कामात यापुढे सुधारणा करावी. अन्यथा कारवाई अटळ आहे, असा इशाराच आयुक्तांनी दिला होता. यंदा महानगरपालिकेतर्फे दोनशे कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रभाग निहाय कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त करण्यात आली आहे.

कर वसुलीच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांमध्ये ६२ कोटींची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे कर वसुली मोहिमेवर जास्त भर दिला जात आहे. शहरातील नागरिकांकडून थकलेला कर वसूल केला जात आहे. त्याचबरोबर महापालिकेकडून प्रत्येक वसुली कर्मचार्‍यांच्या वसुलीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. कामावर असताना शून्य वसुली दाखविल्यावर कोणतेही कारण न ऐकता संबंधिताविरुद्ध कारवाई केलीच जाईल. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कर वसुली करण्यासाठी कामाला लागा, अशा शब्दांत अतिरिक्‍त आयुक्‍तांनी कर्मचाऱ्यांना बजावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या