चक्क आरोग्य केंद्रातच रंगायचा पार्ट्यांचा फड, औरंगाबाद पालिकेला खबरच नाही!

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. बंद असलेल्या महापालिकेच्या कबीरनगर येथील आरोग्य केंद्रांत तळीरामांचा खेळ सुरू असल्याचा प्रकार बुधवारी (दि.९) समोर आला. विशेष म्हणजे, या तळीरामांनी आरोग्य केद्रातील साहित्य देखील लंपास केलेले असून या केंद्रात पार्ट्यांचा बराच धुडगूस घातल्याचे पाहणीतून समोर आले आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी बुधवारी केंद्रांची पाहणी केली. आगामी आठ दिवसात हे आरोग्य केंद्र सुरु करुन तेथे कर्मचारी नेमून ओपीडीची व्यवस्था केली जाणार आहे.

दीड वर्षांपूर्वी कबीरनगरात पालिकेने आरोग्य केंद्राची उभारली केली. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यापासून ते आजवर बंदच आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राचा वापर आजूबाजूच्या वसाहतीमधील टवाळखोर तळीरामांनी ओल्या पार्ट्या आणि गैरकृत्य करण्यासाठी केला. मात्र याचा थांगपत्ता आजवर पालिका प्रशासनालाही लागला नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी या आरोग्य केंद्रात चोरी झाली आणि त्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली.

त्यामुळे बुधवारी अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी या केंद्राला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा आरोग्य केंद्राचा दरवाजा तोडण्यात आल्याचे लक्षात आले. आरोग्य केंद्रात मनपाचे काही साहित्य ठेवलेले होते, त्याचीही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. खिडकीचे ग्रील्स, नळाच्या तोट्या देखील चोरट्यांनी लांबवल्या. आरोग्य केंद्राचा वापर काही मंडळी गैरकृत्यासाठी करीत असल्याचे एकूण परिस्थितीवरुन निदर्शनास आलेे. ओल्या पार्ट्या देखील या ठिकाणी रंगत होत्या, असे स्पष्ट झाल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकारानंतर आता पालिकेने या आरोग्य केंद्राच्या परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP