मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावरून भाजप कायकर्ते-सत्तार समर्थक आमने सामने

औरंगाबादः- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २८ ऑगस्ट रोजी सिल्लोडमध्ये येत आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थक देखील मुख्यमंत्र्यांच्या स्वागता निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहेत. आता एकाच चौकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यावरून सत्तार समर्थक व भाजप कार्यकर्ते इरेला पेटल्याने पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांचा महाजनादेश यात्रे दरम्यानच, भाजपमध्ये प्रवेश होणार अशा चर्चांना उधाण आलेले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे बॅनर सत्तार मित्रमंडळाच्या वतीने संपुर्ण सिल्लोड शहरात लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे भाजपने मात्र सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची शक्‍यता फेटाळून लावत आपला विरोध कायम ठेवला आहे.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सिल्लोडमध्ये दाखल होण्याआधीच आमदार अब्दुल सत्तार समर्थक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादाची थिनगी पडली आहे. शहरातील प्रियदर्शनी चौकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत आम्हीच करणार असा हट्ट दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी धरल्याने आता पोलीस प्रशासन दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

बुधवारी (ता.28) महाजनादेश यात्रा सिल्लोड तालुक्‍यात दाखल होत आहे. या निमित्ताने भवन ते सिल्लोड अशी दुचाकी वाहन रॅली काढण्याचे नियोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतर प्रियदर्शनी चौकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत आणि छोटीशी सभा घेण्यात येणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या दाव्यानूसार आमचा हा कार्यक्रम वीस दिवसांपुर्वीच ठरलेला होता. यासाठी आम्ही नगरपालिकेकडे रितसर परवानगी मिळण्यासाठी अर्ज देखील दिला.

पण नगरपालिका सत्तार यांच्या ताब्यात असल्याने त्यांनी सत्तेचा दुरूपयोग करत आम्हाला परवानगी नाकारली आणि स्वःतासाठी मिळवून घेतली. आता एकाचवेळी एकाच ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणे कसे शक्‍य आहे. सत्तार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रियदर्शनी चौकात जमा झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे सत्तार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते प्रियदर्शनी चौकातच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार यावर अडून बसले आहेत. पोलीसांनी आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून योग्य मार्ग काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
.