fbpx

प्रिया वारियर, दिग्दर्शकाविरोधात औरंगाबादमध्ये पोलिस तक्रार

priya varrier

टीम महाराष्ट्र देशा- ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्याविरोधात औरंगाबादमध्ये एका स्थानिक संस्थेने तक्रार दाखल केली आहे. इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादनंतर औरंगाबादेतही प्रिया आणि दिग्दर्शक ओमर लुलूंविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटातील गाण्यातून इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

जनजागरण समिती या स्थानिक संस्थेने मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांविरोधात आवाज उठवत, जिंसी पोलीस स्थानकात त्यांनी ही तक्रार केली. ‘या गाण्याच्या माध्यमातून मुस्लिम समुदायाच्या धार्मिक समजुती आणि भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही अभिनेत्री प्रिया वरियर आणि दिग्दर्शक ओमर लूलू आणि चित्रपट निर्मात्यांवर भारतीय दंडसविधानाच्या कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत’, असे समितीच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या मोहसीन अहमद यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

यूट्यूबवर गाण्याचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अवघ्या काही तासांतच 10 लाखांपेक्षा जास्त हिट्स या गाण्याला मिळाले. 50 हजारांपेक्षा जास्त यूझर्सनी त्या कालावधीत हा व्हिडिओ लाईक केला होता. लाईक्स आणि व्ह्यूजची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. इन्स्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोवर्समध्ये विक्रमी वाढ झाली.

जिंसी पोलिस स्थानकाकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. ‘एका ठराविक धार्मिक समुदायाने त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत या गाण्याविरोधात आमच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येणार आहे’, अशी माहिती पोलिस निरीक्षक फहीम हाश्मी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. एकीकडे हे गाणे प्रचंड व्हायरल होत असतानाच दुसरीकडे काहीजणांनी त्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. हैदराबादमध्येही मुस्लिम युवकांचा समुहाने प्रिया आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.