औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी

corona

औरंगाबाद : स्पर्शाने नाही तर संपर्काने वाढणाऱ्या कोरोना विसरणे एक नवीन अस्पृश्यता जन्माला घातली आहे. त्याचा अनुभव कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना आला.

औरंगाबाद शहरात झालेला कोरोना बाधिताचा मृत्यू हा नंतर क्लेशदायी ठरल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या एका बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली. सुदैवाने लॉक डाऊन पूर्वी ते आपल्या घरी औरंगाबादला परतले होते. वयोमानानुसार उच्च रक्तदाब आणि मधुमेह याचे ते रुग्ण होते. त्यांना आजारी असल्याचे लक्षात आल्याने त्यात कोरोना विषयी शासनाने जागृती केल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांच्या आजाराविषयी सजग होते. म्हणूनच ते मुंबईहून परतल्यावर त्यांची दोन मुले आणि पत्नी एवढेच लोक त्यांच्या संपर्कात येत होते. उर्वरित कुटुंबातील चार सदस्य हे घराच्या दुसऱ्या मजल्यावर विलग झाले होते. घरात नातू असल्याने त्यांनी खबरदारीचे सगळे उपाय केले होते.

त्यांना सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळीही ही घरातील या तिघां व्यतिरिक्त एक सून त्यांच्या संपर्कात आली होती. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना घाटीत हलवले होते. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत्यूनंतर खऱ्या मरण यातना सुरू झाल्या. त्यांचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा खाजगी गाडी मिळेना. घाटी मध्ये सर्वसामान्यपणे एखादा मृत्यू झाला तर रुग्णवाहिकेचे चालकच त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून देह नेण्यासंदर्भात विचारणा सुरू करतात. पण या बदलत्या परिस्थितीत विनवण्या करुनही कोणी त्यांच्या मदतीसाठी पुढे येईना. शेवटी बड्या मुश्किलीने एक जण तयार झाला. मोजक्याच कशाला दोन मुलांनी मिळून तो देह घरी न नेता थेट स्मशानभूमीत नेला.

स्मशानभूमीतील म्हसणजोग्याने सरण रचायला नकार दिला. शेवटी जन्मदात्या पित्याचे सरण त्यांच्या दोन मुलांनी रचले. विधी करण्यासाठी भन्तेजी मिळाला नाही. कसातरी एक जण तिथे आला त्याने घाईघाईत बुद्धवंदना घेतली आणि आणि तोही निघून गेला.

दोन मुलांच्या उपस्थित पित्याचा अंत्यविधी झाला. पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम या कुटुंबाला करता आला नाही. कारण तोपर्यंत घरातील जे चार जण त्यांच्या संपर्कात आले होते त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

मृत्यू झाल्या झाल्या त्यांच्या घराला सील करण्यात आले. रासायनिक फवारणी केली, शेजारीपाजारी यांनी संपर्क तोडला. सामाजिक बहिष्कार असल्यासारखी परिस्थिती असताना दिवे जाळ्यात काहीजणांनी त्यांच्या घरासमोर फटाके उडवत दिवाळी साजरी केली. कहर म्हणजे पिण्याचे पाणी देण्यासाठी सुद्धा कोणी पुढे आले नाही. मरेल ती माणुसकी कसली, कोरोना बाधित त्या मुलांच्या मित्रांना पिण्याच्या पाण्याची समस्या कळाली. त्यांनी सगळी सामाजिक बंधने झुगारून पाणी आणि त्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याचे धैर्य दाखवले.