औरंगाबाद हिंसाचार : उच्चस्तरीय समितीमार्फत घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

औरंगाबाद- औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून दोघांना आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान याप्रकरणी ‘शहरात उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी केली जाईल. व्यक्ती कोण त्यापेक्षा प्रवृत्ती हाणून पाडणे महत्त्वाचे असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे केली जातील. आतापर्यंत ३५ संशयितांना ताब्यात घेतले आहे,’ अशी माहिती काल गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी दिली.

मोतीकारंजा परिसरात शुक्रवारी रात्री उसळलेल्या दंगलीच्या घटनेची पाहणी गृहराज्यमंत्री पाटील यांच्यासह पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी केली. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘जे काही काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळ‌ाले असून या घटनेची सखोल चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत केली जाईल. नुकसानीचे पंचनामे केले जातील. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत काही चुकीचे संदेश दिले तर नाही ना, याच्या चौकशीचे आदेश सायबर सेल विभागाला देण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त लवकरच रुजू होतील.