fbpx

औरंगाबाद शहरातील हेल्मेट सक्ती एकाच वर्षात फ्लॉप!

helmet

औरंगाबाद/ श्याम पाटील: रस्तेअपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची संख्या लक्षात घेता शहरात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला होता. ही मोहीम राबवण्यापूर्वी जनजागृती करण्यासाठी खर्च देखील केला व्हिडियो डॉक्युमेंट्री, बॅनर वृत्तपत्रांत जाहिराती, रेडिओ वर जाहिराती दिल्या आणि त्यानंतरच सक्ती करण्यात आली मात्र एका वर्षाच्या आतच पोलिसांनी घेतलेली मेहनत वाया गेल्याचं चित्र सध्या औरंगाबाद शहरात पहायला मिळत आहे.

रस्ते अपघातात बहुतांश तरुण डोक्याला मार लागल्यामुळे मृत्युमुखी पडतात. त्यांनी जर हेल्मेट घातलेले असते तर त्यांचा जीव वाचला असता. हे पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट घालावे यासाठी पोलिखात्यांकडून जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती आणि समुपदेशन केले गेले होते. 2017 च्या सुरुवातीला ही मोहीम सुरू केली यापूर्वी २००९ मध्ये अशा प्रकाराची मोहीम राबवण्यात आली होती. मात्र ती औरंगाबादकरांवर लादण्यात आली असे अनेकांना वाटत होते. असे यावेळेस तरी वाटू नये यासाठी प्रथम समुपदेशन करण्यात आले. विविध महाविद्यालयात व्हिडियो डॉक्युमेंट्री दाखवण्यात आल्या. पोलिस अधिकाऱ्यांनी महाविद्यालयांत जाऊन वाहन चालवताना घ्यावयाची सुरक्षा आणि हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले पण पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची बदली झाली आणि या सक्तीला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली.

शहरात लोक सुसाट गाड्या चालवताना दिसतात मात्र त्यांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नाही, शहरातील बहुतेक सिग्नल वर वाहतूक पोलीस उभे दिसतात परंतु विना हेलमेट जाणाऱ्या दुचाकी चालकास साधे हटकवत देखील नाहीत, शिवाय पोलिसांपासून वाचण्यासाठी बहुतेकांना शॉर्टकट मार्गाने जायला आवडते वाहतूक पोलीस मात्र याकडे लक्ष देत नसल्याचे लक्षात येते, वाहतूक पोलीस नुसती ड्युटी करायची म्हणून करायची असे निदर्शनास येते शिवाय हेल्मेट वापरण्याबाबत वाहनचालकांना देखील फारसी काळजी नाही. तुरळक लोक हेल्मेट घालत आहेत यामुळे शहरातील हेल्मेट सक्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, त्यामुळे पोलिसांनी लोकांची जागृती करावी असे शहरातील सुजान नागरिकांना वाटते.