औरंगाबादेत कोरोना नाही मात्र “सारी” चे ६ बळी

औरंगाबाद : देशासह जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा औरंगाबादेत एकही रुग्ण नसला तरी गेल्या ७ दिवसा पासून ‘सारी’ (सिव्हिअरली ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) या आजाराने ६ जणांचा मृत्यू झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. तसेच ‘सारी’च्या रुग्णातही काेराेनासारखीच लक्षणे आढळत असून तीन ते चार दिवसातच अशा रुग्णाचा मृत्यू होत असल्याने आराेग्य यंत्रणा धास्तावली आहे. ८ वर्षीय बालकाचा ‘सारी’ने २३ मार्च राेजी मृत्यू झाला हाेता. त्यापुढील ६ दिवसांत आणखी ५ जण दगावले आहेत. त्यापैकी चाैघे औरंगाबादच्या ग्रामीण भागातील तर एक बुलडाण्याचा हाेता. तसेच हे सर्व परस्परांच्या कधीच संपर्कात आलेले नव्हते.

मात्र या आजाराचे कोरोनासारखेच लक्षणे असली तरी त्यात घाबरण्यासारखे काही नाही. कारण ‘सारी’ हा संसर्गजन्य आजार नाही, असे डॉक्टरांनी कळविले आहे. आतापर्यंत घाटीत ‘सारी’च्या २६ रुग्णांची तपासणी केली असून त्यातील २२ जणांची कोरोनाची टेस्ट निगेटीव्ह आली असल्याचे घाटीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी ‘सारीने’ २३ मार्च रोजी एका खासगी रुग्णालयात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळाल्यावर मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी त्याची दखल घेतली.