औरंगाबाद शहर विकासासाठी सज्ज : आयुक्त

औरंगाबाद : रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन आणि पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधांवर काम करण्यापूर्वी या शहराच्या पुढच्या स्तरावरील नागरी हालचाली, पर्यावरणाचे पालनपोषण आणि करमणूक या क्षेत्रातील विकासाचा विचार केला पाहिजे. भविष्याचा विचार करून औरंगाबाद विकासासाठी सज्ज असल्याचे औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी बुधवारी (दि.२० ) सांगितले. औरंगाबाद फर्स्ट, मराठवाडा एन्व्हायर्नमेंट केअर क्लस्टरच्या पुढाकाराने शहरातील वाहतुकीच्या व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पांडेय म्हणाले की, मनपाने गेल्या १ वर्षात १०० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची कामे पूर्ण केली आहेत. आता १५२ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांवर काम करीत आहे. एएससीडीसीएलने मास्टर सिस्टम इंटिग्रेटर (एमएसआय) प्रकल्पांतर्गत लक्ष ठेवण्यासाठी १०० किमीहून अधिक केबल टाकण्यासाठी खोदकाम करून केबल टाकल्या आहेत. १६८० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणीच्या मार्गावर आहे. शहरात स्ट्रीटलाइट बसविणे जवळजवळ पूर्ण झाले असून अजून कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत.

मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी एकत्रितपणे ई-गव्हर्नन्सवर काम करत आहे. शहरातील १० ऐतिहासिक दरवाजे व शहागंज येथील घड्याळ टॉवरचे काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शहर पर्यटनाला चालना देण्यासाठी स्मार्ट सिटी बस विभाग ई-बस आणण्याची योजना आखत आहे. तरूण- तरुणींसाठी, अ‍ॅव्हेंजर गार्डन आणि २४ बाय ७ करमणूक संकल्पना क्षेत्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे देखील पांडेय म्हणाले.

महत्वाच्या बातम्या