fbpx

औरंगाबाद : खासदारकी गेली, शिवसेनेला औरंगाबादचं पालकमंत्रीपदही सोडावं लागणार?

atul save bjp

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं, अशी मागणी आता स्थानिक भाजपकडून करण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण व्हायची चिन्हे आहेत. सध्या शिवसेनेकडे पालकमंत्रीपद असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत.

अतुल सावे हे औरंगाबादचे आमदार आहेत. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे पालकमंत्रीपद भाजपला मिळावं, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली आहे. यावर शिवसेनेने अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवाचं खापर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवरच फोडण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा युतीमध्ये धुसफूस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला औरंगाबादचं पालकमंत्रीपद पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे होतं. पण तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत त्यांचे वाद समोर आले आणि यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकत्व देण्यात आलं, पण त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली.