औरंगाबाद: तृतीयपंथी बजावणार मतदानाचा हक्क

blank

औरंगाबाद: औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या मतदारसंघात 12 तृतीयपंथी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदारसंघातील 342 मतदान केंद्राची जय्यत तयारी करण्यात आली. मतदान केंद्रासाठी 31 मिनिबस आणि 32 जीप अशा 61 खासगी वाहनांच्या माध्यमाने ईव्हीएम मशीन व संपूर्ण यंत्रणा मतदान केंद्रापर्यंत पोचवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्रासाठी 1,700 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर अडचण निर्माण झाल्यास तातडीने मदत करता यावी यासाठी 14 फिरते पथक तयार करण्यात आले आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघात तीन लाख 35 हजार 876 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार एक लाख 79 हजार तर महिला मतदार एक लाख 56 हजार 859 आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात 12 तृतीयपंथी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदारसंघात 336 मतदान केंद्र आहेत. तसेच ज्या ठिकाणी मतदारसंख्या जास्त होते, अशा केंद्राला सहयोगी मतदान केंद्र दिले जाते. त्यानुसार सहा मतदान केंद्र असे एकूण मतदारसंघात 342 मतदान केंद्र आहेत. यामध्ये 10 मतदान केंद्र हे क्रिटिकल (संवेदनशील) आहेत. त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून मतदान केंद्रापर्यंत मतदान यंत्र घेऊन जाणे आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर परत आणण्यासाठी शहरातील गल्ली बोळातील केंद्रापर्यंत जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. रविवारी (ता.20) दुपारनंतर सर्व मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य पोचवण्यात आले असल्याचे श्रीमती भोसले यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या