औरंगाबाद विमानतळ लवकरच होणार आंतरराष्ट्रीय, विस्तारीकरणाच्या प्रक्रियेला गती!

औरंगाबाद : विमानतळ विस्तारीकरणाचे भिजत घोंगडे गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. मात्र आता औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार असून त्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. विस्तारीकरण करण्यासाठी १०१ एकर जागा लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जमीन मोजणीची कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे. मार्किंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठी एक ते दीड हजार घरे या विस्तारीकरणात जातील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये औरंगाबाद विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय विमानासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विषयाला गती मिळू शकलेली नव्हती. आता पुन्हा एकदा विस्तारीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रयत्न सुरु केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णयही जाहीर केला होता. याशिवाय एमआयडीसीकडून दोनशे कोटी रुपयांचा निधी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही या विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा विमानांची उड्डाणे वाढताना दिसत आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून विमानतळासाठी अपेक्षित असलेल्या जागेनुसार मालमत्ता मोजणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. हा मोजणीचा कालावधी पूर्ण झाला असून विमानतळासाठी लागणाऱ्या जागेची मार्किंग करण्यात आली आहे. विमानतळ चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, हिनानगर, मोतीवाला नगर, संघर्ष नगरचा काही भाग तसेच पायलट नगरी, रामनगर, मुर्तिजापुर इतर रहिवासी भागासोबतच शेत जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या भागात १८२ एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP