कारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या गाळप केलेल्या ऊसाचे पैसे तात्काळ जमा करावेत अन्यथा 2 एप्रिल 2019 रोजी साखर आयुक्त साखर संकुल कार्यालय, पुणे येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अतुल खुपसे यांनी दिला आहे.

याबाबत साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील विठ्ठल शुगर (कमलाई कारखाना) या कारखान्याने ऊस गाळप केल्या पासून शेतकऱ्यांना एकही हप्ता दिला नाही. तसेच मकाई कारखान्याने डिसेंबर-जानेवारी फक्त १०००/- रुपये प्रति टन हप्ता जमा केलेला आहे. त्यापुढील पैसे दिलेच नाहीत. आदिनाथ कारखान्याने फक्त १२००/- रुपये जमा केले. त्यापुढील बाकीचे पेमेंट केले नाही. भैरवनाथ शुगर विहाळ कारखान्याने जानेवारीपासून एक रूपये दिला नसल्याचा आरोप खुपसे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्यापासून 14 दिवसात बिल देणे बंधनकारक आहे. तरीही कारखानदार पैसे देत नाहीत. मकाई कारखान्याने 24 महिने कामगाराच्या पगारी दिले नाहीत. आदिनाथ ने शेतकरी आणि वाहनाचे पैसे दिले नाही. कमलाई कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून तीनशे वाहन मालकाच्या नावावर प्रत्येकी बारा लाखाने कर्ज उचलले आहे. शेतकऱ्याला खत बियाणे या नावावर 30 कोटी उचलले तरी तसेच विठ्ठल शुगर म्हैसगाव या कारखान्याने जानेवारीपासून अद्याप शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाही असं खुपसे यांनी म्हटलंय.

आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी अडचणीत आहे माञ साखर कारखानादार पैसे देत नाहीत .करमाळा तालुक्याला विठ्ठल शुगर (कमलाई कारखाना) ने अद्याप कसलेही पैसे दिले नाहीत. आदिनाथ, मकाईने तर दोन वर्षापासुन कामगारांच्या पगारी दिल्या नाहीत.विठ्ठल शुगर (कमलाई कारखाना) करमाळा , विठ्ठल शुगर म्हैसगाव, मकाई कारखाना, आदिनाथ कारखाना, करमाळा कर्मयोगी कारखाना घागर गाव, भैरवनाथ कारखाना विहाळ या कारखान्याने शेतकऱ्यांचे थांबवलेल्या एफआरपी प्रमाणे बिल देऊन त्याचे व्याज त्या खात्यात जमा करावे. जर शेतक-यांना तात्काळ पैसै दिले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असे अतुल खुपसे यांनी म्हटलं आहे.