‘लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही’

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस होता. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नसल्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला. तर, ‘खोटे बोलून लाट येते, सत्ता येते पण ती टिकवणे कठीण असते,’ असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपने हल्लाबोल केला आहे.

‘खोटे बोलून लाट येते, सत्ता मिळते पण ती टिकत नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणे खरे असेल तर लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही…’ असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर फडणवीसांची टीका !

‘राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर सभागृहात दिले, त्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र ते येऊ शकले नाही. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाही.’ अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तर, ‘मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले. पूर्वी ते नवीन होते. पण, चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजलेले नाही. शेतकऱ्यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकऱ्यांची चिंता आहे,’ असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या