मुंडेंनी दुसरी पत्नी, अपत्य व त्यांच्या खर्चाबद्दल माहिती लपवल्याने आमदारकी रद्द होणार ? 

dhananjay munde

मुंबई :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी  पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मुंडेंची आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे. ‘दुसरी पत्नी व अपत्यांबाबतची माहिती, त्यांच्यावर केलेला खर्च निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याबद्दल सामाजिक न्याय (???) मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी असे पत्र मी निवडणूक आयोगाला लिहिले आहे… ठाकरे सरकार मध्ये अशाच नमुन्यांची भरमार आहे.’ अशी जहरी टीका करत भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या