‘संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत’

sanjay rathod

मुंबई : तब्बल ४० किलोमीटरचं अंतर कापून अखेर वन मंत्री संजय राठोड यांचा ताफा अखेर पोहरादेवीत दाखल झाला. त्यानंतर राठोड यांनी कुटुंबासह जगदंबा मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ते सेवालाल महाराज यांचं दर्शन घेणार आहेत. राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला

संजय राठोड हे साधारण ११ च्या सुमारास यवतमाळमधून पोहरादेवीकडे सहकुटुंब रवाना झाले होते. हे ४० मिनिटांचं अंतर कापून ते तासाभरात पोहरादेवीत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, पदाधिकारी आहेत. तब्बल १७ वाहनांच्या ताफ्यासह ते पोहरादेवीत आले आहेत. यावेळी मंदिर परिसरात हजारो लोक जमले आहेत. त्यामुळे राठोड यांची गाडीला वाट मिळण्यासाठी मोठी अडचण होत असल्याने पोलिसांना जमावावर लाठीमार करावी लागली. मंदिर परिसरात हजारो लोक जमल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तीन तेरा वाजले आहेत.

यावरून भाजपने आता संजय राठोड यांना चांगलच फैलावर घेतलं आहे. ‘संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत. तो गुंड होता हा मंत्री आहे एव्हढाच फरक… समाजाला टाचेखाली चिरडणारी दबंग मानसिकता सारखीच आहे’. असा घणाघात भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

तर, माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील संजय राठोड यांना चांगलच फैलावर घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या आहेत. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून कोरोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता ते पोहरादेवीत येत आहेत. त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही. त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे हे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन नसून मुख्यमंत्र्यांसाठीचं आव्हान प्रदर्शन आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या