मुंडे प्रकरणात विरोधकांकडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; पवारांचा भाजपवर निशाणा

chandrakant patil vs sharad pawar

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडेंवरील आरोपांवर भाष्य केलं आहे.

‘धनंजय मुंडे यांनी भेटून या प्रकरणातील त्यांची बाजू मांडली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण संयमाने हाताळण्याची गरज आहे अशी भूमिका घेतली. तर, दुसरीकडे त्यांचे पक्षप्रमुख (चंद्रकांत पाटील) व अन्य लोकांचे अन्य मत आहेत. अशा प्रकरणात विरोधकांकडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न या पेक्षा अधिक सांगण्याची गरज नाही’ अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

मुंडेवरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून एकत्र निर्णय घेणार

‘त्यांच्यावरील आरोपांचं स्वरूप हे गंभीर आहे. यावर आम्हाला पक्ष म्हणून निर्णय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन याविषयी निर्णय केला जाईल. मुंडेंनी मला सखोल माहिती दिली असून इतर सहकाऱ्यांना ती सांगून त्यांचे मत घेणं हे माझं कर्तव्य आहे. लवकरात लवकर यावर पुढील पावले उचलली जातील’ अशी माहिती देखील शरद पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या