सरकारला आक्रमकपणे धारेवर धरा- उद्धव ठाकरे

udhav thakare

मुंबई: भाजपसह सत्तेत भागीदार असलो तरी सातवा वेतन आयोग लागू करणे, ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, कामगारविरोधी कायदे आदी मुद्दय़ांवर आक्रमकपणे सरकारला धारेवर धरा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या आमदार-खासदारांना दिला. शिवसेनेच्या आमदार-खासदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील पंचतारांकित हॉटेलात झाली.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपविरोधी भूमिका घेऊन उद्धव ठाकरेंनी चांगलीच रणनीती आखली आहे. तसेच त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच पुन्हा स्पष्ट केलं.

देशात कामगार कायद्यांच्या सुधारणांच्या नावाखाली कामगारांच्या मुळावरच घाव घालण्याचे काम सुरू आहे. या धोरणांमुळे संघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या कमी होईल. असंघटित क्षेत्रातील कामगार वाढतील. हे कामगारविरोधी धोरण आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. पीएनबी घोटाळ्यावर बोलतांना ठाकरे म्हणाले, सामान्य गुंतवणूकदार बँकांमध्ये एका खात्रीने पैसे ठेवतो. नीरव मोदीसारखे लोक हजारो कोटी रुपये बुडवून पळून जाणार असतील तर सामान्य गुंतवणूकदारांचे काय होणार. यासाठी केंद्राला धोरणे आखण्यास भाग पाडा. असा आदेश ठाकरेंनी दिला आहे.