राम जन्मभूमी खरेदीत हेराफेरीचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर तीर्थक्षेत्र विकास ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. ज्यांनी हे सगळे प्रकरणा प्रामुख्याने चव्हाट्यावर आणले आहे, ते आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी त्यांच्या घरावर आज हल्ला झाला असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या घराच्या नेमप्लेटवर काळा रंग फासण्यात आला आहे.

संजय सिंग यांनी ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली आहे.

संजय सिंह यांच्या आरोपांनंतर देशभरात खळबळ माजली असून याचवेळी त्यांच्या घऱावर हल्ला झाला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी चालेल’.

काय आहे हे प्रकरण?

अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीवरून हा वाद उफाळला आहे. ही मुख्य मंदिराची जमीन नाही. मात्र येथे काही इतर मंदिरे उभी करण्याची परिषदेची योजना असल्याचे सांगितले जाते. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करताना त्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी किमतीची जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. तसेच कुसुम पाठक या महिलेकडून १८ मार्च २०२१ रोजी १८ कोटी २० लाख रुपयांना जमीन खरेदीच्या व्यवहाराची नोंद करणारे अयोध्येतील ‘बिल्डर’ सुलतान अन्सारी हे आज अयोध्येतील घरातून सहकुटुंब बाहेर निघून गेल्याने वेगळे वळण मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या