गर्भपातास नकार दिला म्हणून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

पुणे : पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे आता डॉक्टर वर सुद्धा हल्ला करण्याच्या प्रमाणत वाढ झाली आहे. पुण्यात एका अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यास नकार दिल्यामुळे एका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुण्याच्या पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल बिडकर यांच्याकडे काही दिवसांपूर्वी एका तरूणीला गर्भपातासाठी आणण्यात आले होते. मात्र, डॉ. बिडकर यांनी बेकायदेशीर पद्धतीने गर्भपात करायला नकार दिला होता.

याच वादातून काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे . या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.