मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. पण अयोध्या दौऱ्याच्या १५ दिवस आधी २० मे रोजी राज ठाकरे यांनी ट्विट करून आपला अयोध्या दौरा तूर्तास पुढे ढकलल्याची माहिती दिली. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलल्यानंतर अनेक प्रकारच्या अटकळांना सुरुवात झाली आहे. राज यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिजभूषण ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात सातत्याने आंदोलन करत होते आणि राज यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असे सांगत होते, तो एक सापळा होता आणि महाराष्ट्रात हा सापळा रचला गेला होता.
त्यावेळी ब्रिजभूषण कोणाच्या इशाऱ्यावर आंदोलन करत होते आणि हा सापळा कोणी रचला, हे राज ठाकरे यांनी सांगितले नाही, मात्र मंगळवारी ब्रिजभूषण शरण सिंह आणि शरद पवार यांचे साडेतीन वर्षे जुने फोटो मनसे नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंसोबत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला खत-पाणी देण्याचे काम राष्ट्रवादी करत असल्याचा आरोपही करण्यात आला. मनसेचे नेते गजानन काळे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
यावर मनसे नेते योगेश चिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ” एका मराठी माणसाला श्रीरामाचे दर्शन होऊ नये म्हणून षडयंत्र रचणारा एक नास्तिक मराठी माणूस अवघ्या महाराष्ट्राने पाहीला. विश्वासहार्यता नाही म्हणून पंतप्रधान बनता आलं नाही. महाराष्ट्राचे कायमचे भावी पंतप्रधान म्हणजे शरद पवार साहेब. त्यामुळे अशा प्रकाराने शरद पवार यांची अख्या महाराष्ट्राने विश्वासहर्ता गमावली आहे,” अशी टीका मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केली.
रोहित पवारांनी साधला मनसेवर निशाणा
शरद पवारांवर रसद पुरवल्याचा आरोप झाल्यानंतर रोहित पवारांनी मनसेवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार ब्रिजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.”
महत्वाच्या बातम्या :