आठवले दोन दिवसांत पलटले! शिवसेनेला म्हटले भाजपसोबत या, अन् आज केले राष्ट्रवादीला आवाहन

ramdas athawale

मुंबई : रिपाईंचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या विनोदी शैलीसाठीही ओळखले जातात. कविता, उपाहासात्मक भाष्य, टोलेबाजी, वेगळ्या ढंगाचे भाषण इत्यादी गोष्टींद्वारे ते राजकीय वातावरणात हास्य निर्माण करतात. त्यांच्या अशा या वागण्यांवर विरोधकांकडून नेहमी टीका होत असते. तर सोशल मीडियावर वारंवार आठवलेंना ट्रोल केले जाते. परंतू आठवले यांनी याकडे दुर्लक्ष केले.

त्यांचे असे वागणे सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत यावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. म्हणजे, माध्यमांद्वारे, जाहीरपणे तसे ते बोलतात. खासगीत त्यांनी काय प्रयत्न केले हे त्यांनाच ठावूक. परंतू राज्यात भाजपची सत्ता स्थापन व्हावी म्हणून त्यांना नेमक्या कोणत्या पक्षाची गरज आहे, हे त्यांनाच माहिती नाही की काय असे दिसून येत आहे. कारण, दोनच दिवसांपूर्वी आठवलेंनी शिवसेनेला भाजपसोबत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, काल शुक्रवारी मोदी-पवार भेटीनंतर आज लागलीच त्यांनी राष्ट्रवादीला भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी काय झाले?
पुणे येथे दि. १६ जुलै रोजी एका कार्यक्रमानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे सरकार टिकून आहे. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शिवसेनेने भाजप सोबत यावे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी अजून वेळ गेलेली नाही. शिवसेनेने स्वत:चे नुकसान थांबवावे,’ असे आवाहन आठवले यांनी केले.

आज रामदास आठवले काय म्हणाले?
‘शरद पवारांनी आपला निर्णय बदलावा अशी माझी त्यांना विनंती आहे. राज्यात शिवसेनेला त्यांनी दिलेला पाठिंबा काढून घ्यावा. काँग्रेस पक्ष देखील वारंवार तुम्हाला इशारा देत आहे. नाना पटोले हे शरद पवारांविरोधात वारंवार विधानं करत आहेत. त्यामुळे पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आली आहे. पवारांमुळेच राज्यात काँग्रेस पक्ष शिवसेनेला पाठिंबा देत आहे. राज्याला ज्या पद्धतीचे प्रबळ सरकार हवं तसं हे सरकार अजिबात नाही, असे सांगत आठवले यांनी पवारांना भाजपसोबत सत्तास्थापन करण्याचे सुचवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या