fbpx

ऐकावे ते नवलचं… एलियनचा सांगाडा

ata 1

१५ वर्षापूर्वी चिली च्या अटकामा वाळवंटात एका व्यक्तीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली एक वस्तू भटकंती करत असताना आढळून आली. हि वस्तू चामड्याच्या बॅगमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवण्यात आली होती. काहीतरी वेगळ यात असेल या आशेने त्याने जेव्हा उघडून बघितल तेव्हा तो स्तब्धच झाला. खरे तर घाबरून गेला. त्या पांढऱ्या कपड्यात त्याला एक ६ इंच लांबीचा सांगाडा आढळून आला. १२ हाडांच्या जोडी मानवात असताना ह्या सांगाड्याला फक्त १० जोड्या होत्या. डोळ्यांची खोबणी सांगाड्याच्या मानाने खूप मोठ्या होत्या. डोक्याची कवटी लंब आकारात असून ती निमुळती होत गेली होती. लांबून अगदी माणसासारखा वाटणारा सांगाडा पण आपल्या आकारामुळे आणि इतर गुणांनमुळे अगदी एलियन चा असावा असा कयास बांधला गेला.

अता अस त्याच नामकरण केल गेल व पूर्ण जगात अता हा चर्चेचा विषय बनला. ह्या सांगाड्यात अगदी डात सुद्धा स्पष्ट दिसत होते. तसेच पूर्ण रचना हि मानवासारखीच होती. हा सांगाडा “सिरीयस” ह्या एका टी व्ही शो मध्ये पण आला. ह्यावर अनेक बाह्य जगावर जीवन आहे अस मानणाऱ्या अनेक लोकांनी अता कुठून येऊ शकतो ह्यावर आपले अनेक तर्क मांडले. अनेक लोकांनी ह्यावर विश्वास हि ठेवला पण काही वैज्ञानिकांना हे कुठेतरी पटत नव्हत.

काही वैज्ञानिकांनी अता च विश्लेषण करण्याची परवानगी मागितली. डॉक्टर नोलन नी ह्या सांगाड्याचे डी.एन.ए. चा अभ्यास केला. छातीच्या पिंजऱ्यातील तसेच उजव्या बाजूच्या हाडा मधील स्याम्पल तपासले गेले. भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट अशी कि ह्या डॉक्टर नोलन च्या टीम मध्ये अमेरिकन भारतीय डॉक्टर अतुल बुत्ते ह्यांचा समावेश होता. डॉक्टर बुत्ते हे कॉम्प्यूटेशनल बायोलॉजीस्ट असून युनवरसिटी ऑफ क्यालिफोर्निया इकडे कार्यरत आहेत. त्यांनी ह्या संशोधनात महत्वाच योगदान दिल असून ह्या संशोधनाने हे सिद्ध झाल आहे कि अता चा सांगाडा एलियन नसून मानवाचा आहे.

अती च्या डी.एन.ए. नमुन्याचा अभ्यास केल्यावर अस लक्षात आल कि नुसता हा माणसाचा नसून तिथल्याच एका पिढीच प्रतिनिधित्व करत आहे जिकडे तो सापडला म्हणजे चिली चा. ह्या डी.एन.ए. मध्ये जे बदल झाले त्यामुळे ह्या सांगाड्याच्या आकारात बदल झाले. ह्या बदल झालेल्या डी.एन.ए. ना शोधण्यात यश आल आहे. तसेच हा सांगाडा एका मुलीचा असून हि बदल झालेली रचना वंशपरंपरेने झालेली असावी असा कयास मांडण्यात आलेला आहे.

अता चा पूर्ण सांगाडा हा फक्त ६ इंचाचा असला तरी हाडांच्या रचनेवरून ती साधारण ६ वर्षाच्या मुलाइतकी वाढलेली आहेत. संचिता भट्टाचार्य ह्या डॉक्टर भूत्ते यांच्या लॅॅब मध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकेच्या मते अता च्या जीनोम मधील अनेक रचना ह्या वेगळ्या असून अभ्यासपूर्ण आहेत. जीनोम च्या अश्या वेगळ्या रचनेमुळे अता फक्त जन्म व्हायच्या आधीच्या सांगाड्याप्रमाणे भासत आहे.

गेले अनेक वर्ष एलियन बनून राहिलेला हा सांगाडा शेवटी माणसाचा आहे ह्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. ह्यात अमेरिकन भारतीय डॉक्टर अतुल बुत्ते सोबत संचिता भट्टाचार्य ह्याचं योगदान आहे. डी.एन.ए. सोबत जीनोम ची रचना समजण्यात अजूनही आपण मागे आहोत. अता सारख्या सांगाड्याचा अभ्यास करून त्यांच्या रचनेत होणारे बदल किती मोठा परिणाम एका जिवामध्ये करू शकतात ह्यातून त्यांची शक्ती पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ह्या सगळ्या प्रयोगामध्ये योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांच अभिनंदन.

– विनीत वर्तक