fbpx

मुंडे – गडकरी मनोमिलन ; साडे चार हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाचे गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

टीम महाराष्ट्र देशा : भाजप मध्ये एकेकाळी संघर्ष होता मुंडे आणि गडकरी गटात. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यातील हा संघर्ष अनेकवेळा दिसून सुद्धा आला. पण आता याच दोन गटात मनोमिलनाची चर्चा जोर धरू लागली आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर त्यांचे सर्मथक सैरभैर अवस्थेत आहेत. स्वाभाविक गुणधर्मानुसार ती भाजपवर चिडतही आहेत. याचा फायदा भाजपतील आणि बाहेरील मंडळी घेत आहेत. मुंडे गटाच्या संतप्त भावना पक्षश्रेष्ठींसमोर बंडाची भाषा म्हणून कौशल्याने मांडण्याचा उद्योग पक्षातीलच काही मंडळी करत आहेत. याचा फटका सर्मथक नेत्यांना बसावा हीच त्यामागील भूमिका आहे. विरोधी पक्षाकडून ही संतापाची भावना अधिक तीव्र कशी होईल याची काळजी घेतली जात आहे.

यामुळे पक्षाचे डॅमेज रोखण्यासाठी मास्टर स्ट्रोक खेळला गेला आहे. बीड जिल्ह्यातील विविध भागातून जाणा-या साडे चार हजार कोटी खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमीपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक, जहाजबांधणी, गंगा व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रथमच बीड मध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत.

गोपीनाथ मुंडे – छगन भुजबळ यांच्या नसण्याने ओबीसी समाजात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरण्याच्या दिशेने पंकजा मुंडे यांनी वाटचाल ही पूर्वीपेक्षा अधिक आक्रमकतेने आता दिसत आहे. तर त्यांनी गाव तिथे विकास यात्रा काढून जनतेत जाऊन आपले नेतृत्व ठाम केले आहे. नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या एका सभेत माझ्या नेतृत्वाला कोहीही धक्का लाऊ शकत नाही अस वक्तव करत आपण ‘मास लिडर’ असल्याच ठणकावून सांगितल होत. त्याचाच भाग म्हणून पक्षातील संघर्ष टाळण्यासाठी आणि निर्विवाद नेतृत्वाचा रस्ता खुला होण्यासाठी उद्याचे रस्त्यांचे भूमिपूजन ही नवीन राजकारणाची नांदी निश्चित ठरणार आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील विविध राज्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत झाल्याने या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौरा त्यांनी आखला असून गुरुवारी परभणी-नांदेड-बीड या जिल्ह्यात भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. यात बीड जिल्हयातील ७२९ कि.मी.लांबीच्या व ६०४२ कोटी रु.च्या मंजूर कामापैकी ४५८७ कोटी ५४ लाख रु.च्या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते महामार्ग रुंदीकरण प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण बीड जिल्ह्यातून होणार आहे. सर्व भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर सभेचा मुख्य सोहळा अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या अंबासाखर परिसरात दु.२ वा. होणार आहे. या कार्यक्रमास जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाशी शोभा वाढवावी असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

3 Comments

Click here to post a comment