वयाच्या ९३ व्या वर्षी गणपतराव विधानसभेच्या रिंगणात, विरोधी नेत्यांच काय ?

सांगोला – विधानसभा निवडणूकीला अजून बराच कालावधी बाकी असला तरी सांगोल्यात विधानसभेच्या तयारीला जोर आला आहे. तब्बल १० वेळा सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेल्या गणपतराव देशमुख यांनी वयाच्या ९३व्या वर्षी पुन्हा उभा राहण्याची तयारी सुरु केली आहे. गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यात कार्यकते मेळावे घेवून पुन्हा आपली दावेदारी सिद्ध केली आहे. तरीही शेतकरी कामगार पक्षाकडून अधून मधून उमेदवार बदलण्याच्या चर्चा होत असतात. तरीही शेकापच्या कार्यकर्त्याच्या मते याही वेळी गणपतराव देशमुखच उमेदवार असतील. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी कडून गणपतराव देशमुख यांनाच पाठींबा जाहीर होईल, अशी शक्यता आहे.

गणपतराव देशमुख यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी शहाजीबापू पाटील यंदा सातव्यांदा विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांचा पक्ष मात्र कोणीच नक्की सांगत नाही. भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, महिला महासंघाच्या अध्यक्षा राजश्री नागणे यांनी देखील विधानसभेची तयारी सुरु केली आहे. परंतु शहाजीबापू पाटील, श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे याच्या उमेदवारीचे भवितव्य मात्र शिवसेना भाजपा युतीवर अवलंबून आहे. शहाजीबापू पाटील यांनी मागची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. मागच्या काही दिवसात त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या देखील चर्चा होत्या. पण सध्या तरी त्यांचा नक्की पक्ष कोणता हे मात्र कोणीच सांगू शकत नाही.

भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख पुन्हा भाजपाकडून उमेदवारी मिळवणार का, हे देखील पाहणे महत्वाचे आहे. मागच्या काही दिवसात तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झालेल्या राजश्री नागणे यांनी देखील मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली आहे. त्यांचा भाजपा प्रवेश होणार अश्या चर्चा असताना अधूनमधून त्या शिवसेनेत जाणार अश्याही चर्चा चालू आहेत. भाजपा किंवा शिवसेना कोणत्याही पक्षाकडून पण निवडणुक लढवणार अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. माजी आमदार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत.

तबब्ल ५० वर्षे तालुक्याच प्रतिनिधित्व केलेले गणपतराव देशमुख यांचा विजय सध्या तरी नक्की मानला जातोय कारण विरोधी पक्षाकडून तयारी करण्याऱ्या कोणत्याच नेत्याचा अजून पक्षच नक्की सांगता येत नाही. तब्बल सहा निवडणुकीत पराभूत झालेले शहाजीबापू पुन्हा लढणार. यावेळेस तरी ते जिंकणार का असाही प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी शिल्लक आहे. गणपतराव देशमुख, शहाजीबापू पाटील, राजश्री नागणे, श्रीकांत देशमुख या नावासोबत विधानसभा निवडणुका जवळ येताच अजून काही नाव समोर येतील. पण सांगोल्यातील जनता आपला कौल नक्की कोणाला देणार, हे कळायला मात्र विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार.