किमान चार कोटी नवीन नोकऱ्या निर्माण व्हायला हव्या होत्या : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभे पूर्वी भाजप सरकार आणि मोदींनी देशाला आणि देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती त्यातील एका आश्वासनावर उद्धव ठाकरे यांनी सरकारची शाळा घेतली. केंद्रातील राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी दरवर्षी एक कोटी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. त्या हिशेबाने मागील चार वर्षांत किमान चार कोटी नवीन नोकऱ्या निर्माण व्हायला हव्या होत्या. प्रत्यक्षात आज देशात तीन कोटी तरुण बेरोजगार आहेत तर २४ लाख सरकारी जागा रिक्त आहेत. देशातील बेरोजगारांचा ‘कारवाँ’ हा एका सरकारमागून दुसऱ्या सरकारमागे असाच सुरू आहे. तो थांबलेला नाही. उलट वर्षागणिक मोठाच होत चालला आहे. ‘आयुष्मान’मुळे त्यातील एक लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार असतील तर चांगलेच आहे, पण एक लाखाचे ‘ठिगळ’ कसे पुरणार? एक कोटी रोजगारांचे आश्वासन देणाऱ्यांच्या राज्यातही रोजगाराचे घोडे पेंडच खात असेल तर कसे व्हायचे?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, ‘आयुष्मान’मुळे त्यातील एक लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार असतील तर चांगलेच आहे, पण एक लाखाचे ‘ठिगळ’ कसे पुरणार? एक कोटी रोजगारांचे आश्वासन देणाऱ्यांच्या राज्यातही रोजगाराचे घोडे पेंडच खात असेल तर कसे व्हायचे?, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासने आणि सत्ता स्थापन झाल्यापासून त्यांची धोरण, रोजगार निर्मितीचा वेग तसेच, देशभरातील बेरोजगारी अश्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या ‘पण नोकऱ्या कुठे आहेत?’ या विधानवरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारची शाळा घेतली. ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका प्रश्नावर उत्तर देताना ‘नोकऱ्या कुठे आहेत?’ असे म्हणाले. त्याचा संदर्भ वेगळा असला तरी ते खरंच बोलले’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.