अखेर मांजरम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास मिळाले पशुधन विकास अधिकारी

hospital

नायगाव: मांजरम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात श्रेणी १ येथे गेली सहा वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी LDO डॉक्टर नव्हते. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. याबाबत वेळोवेळी मागणी करून देखील अधिकाऱ्यांची नेमणूक होत नव्हती. शेवटी स्थानिक शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे यांच्याकडे सदर प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.

पांडुरंग शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने डॉ. शशिकांत भालके यांची नियुक्ती केली आहे. शिंदे यांनी याबाबत राज्यांचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर साहेब यांची सतत भेट घेऊन, सतत निवेदन देऊन गावाला कायमचा पशुवैद्यकीय डॉक्टर मिळावा अशी वारंवार मागणी केली. एवढेच नव्हे तर यासाठी राज्यांचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतः महादेव जानकर यांच्याशी चर्चा करून याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली होती.

याबाबत पांडुरंग शिंदे म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून येथे पशुवैद्यकीय डॉक्टर नव्हता हे दुर्दैवी होते यातूनच आपल्या लक्षात येईल की, स्थानिक प्रतिनिधीचे किती लक्ष आहे. असो,आम्ही हा विषय हाती घेतल्यानंतर गांवातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार, ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच इतर सर्वांनी सहकार्य केले. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचे गावकऱ्यांच्या तसेच रयत क्रांती संघटनेच्या वतीने जाहीर आभार मानतो. तसेच नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी योग्य मार्गदर्शन केले.