वडील, आजोबा स्टेजवर आणि पवारांची तिसरी पिढी कार्यकर्त्यांमध्ये

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पुण्यामध्ये हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेच आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यभरातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार आणि पार्थ पवार हेही यावेळी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे दोघेही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये बसून पवार घराण्याकडून कायम दाखवण्यात येणारा सामान्यपणा दाखवून देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आज आपला 20 वा वर्धापन दिवस देखील साजरा करत असल्याने आजच्या सभेला विशेष महत्व आहे. जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत. पवार घराण्यातील तिसरी पिढी म्हणजेच राजेंद्र पवार यांचे पुत्र आणि पुणे जिल्हापरिषद सदस्य असणारे रोहित पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या सभेच्या नियोजनावर स्वतः लक्ष ठेवत आहेत. तसेच सामान्य कार्यकर्त्यांमध्ये बसून आपणही नेते नाही तर पक्षाचे कार्यकर्तेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रोहीत पवार हे सध्या कृषी व्यवसायाशी निगडित असणाऱ्या बारामती ऍग्रो कंपनीची जबाबदारी सांभाळत आहेत, तसेच ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून देखील काम पाहत आहे. पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सहकारनगर भागात असणाऱ्या शिंदे हायस्कूलच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोल यात्रेची सांगता सभा असल्याच सांगितले जात आहे, विशेष म्हणजे जेलमधून सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच जेष्ठ नेते छगन भुजबळ हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like
Comments
Loading...