आओ जाओ घर तुम्हारा? कमाल करते हो पांडेय जी!

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीपासून टाऊनहॉल परिसरातील महापालिका मुख्यालयात बाहेरुन येणाऱ्यांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रोज कोरोना चाचणी सुरु आहे. मात्र ‘महाराष्ट्र देशा’ने याठिकाणी पाहणी केली असता मनपा इमारत टप्पा क्रमांक ३ मधून मनपा मुख्यालयाला जोडणारा स्काय वॉक आहे. येथून मनपाच्या मुख्य इमारतीत सहज प्रवेश मिळत असल्याचे दिसून आले. इतरांना नियम शिकवणाऱ्या महापालिकेतच अशाप्रकारे नियमांची पायमल्ली होत असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल हे न पाहिलेलेच बरे.

जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. विशेषतः शहरात नागरिक नियम पाळत नसल्याने कोरोना रूग्णांची संख्या अधिक गतीने वाढते आहे. कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक गतीने पसरत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेने आता कडक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीपासून टाऊनहॉल परिसरातील महापालिका मुख्यालयात बाहेरुन येणाऱ्यांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी देखील मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.२) ‘महाराष्ट्र देशा’ने याठिकाणी पाहणी केली असता समोरून प्रवेश करणाऱ्याची संख्या बोटावर मोजण्या इतकी आढळून आली.

मात्र त्या तुलनेत मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या मनपा इमारत टप्पा क्रमांक ३ मधून वरती गेल्यास शहर अभियंत्यांचे कार्यालय आहे. यासमोरून गेल्यावर सदर इमारत आणि मनपा मुख्यालय यांना जोडणाऱ्या स्काय वॉक मधून थेट महापालिकेच्या मुख्य इमारतीत जाता येते. अनेक जण याचा वापर करून मनपात मागच्या दरवाज्याने जातांना आढळून आले. त्यामुळे या अँटिजेन कोरोना चाचणीच्या निर्णयाचा नेमका किती फायदा होतोय हे यानिमिताने दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या