मुख्‍यमंत्री सहायता निधीतून ‘आरोग्‍याचा चातुर्मास’ या उपक्रमासाठी मदत

CM IN PUNE

पुणे : डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर बोपोडी येथे महिलांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या मोफत आरोग्‍य तपासणी शिबीरास मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पहाणी केली. ‘आरोग्‍याचा चातुर्मास’ ही अभिनव संकल्पना असून ‍या माध्‍यमातून प्रत्‍येक व्‍यक्‍तीपर्यंत आरोग्‍य सुविधा मोफत पोहोचवण्‍यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्‍पद असून असे उपक्रम राज्‍यभरात राबविण्‍यात यावेत.नागरिकांना आरोग्‍यविषयक सुविधा देण्‍यासाठी शासन प्राधान्‍य देत असून शासनाच्‍या आरोग्‍यविषयक विविध योजनांमधून कर्करोग, ह्दयरोग यासारख्‍या दुर्धर आजारांवर मोफत शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत. आतापर्यंत सुमारे २० हजार रुग्‍णांवर अशा प्रकारच्‍या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत. ‘आरोग्‍याचा चातुर्मास’ ही नवीन संकल्‍पना असून या संकल्‍पनेमध्‍ये केवळ आरोग्‍य तपासणीच होत नाही तर आवश्‍यकता भासल्‍यास शस्‍त्रक्रिया केली जाणार आहे. शासनाच्‍या विविध आरोग्‍यविषयक योजना तसेच मुख्‍यमंत्री सहायता निधीतून या उपक्रमासाठी आवश्‍यक ती मदत करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.
आमदार विजय काळे यांनी आरोग्‍य शिबीराच्‍या आयोजनामागचा हेतू सांगितला. ते म्‍हणाले, आजच्‍या शिबीरात आतापर्यंत ९०० महिलांची आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली असून सायंकाळपर्यंत २ हजार महिलांची तपासणी होईल. शहरात अन्‍य ठिकाणीही अशाच प्रकारची आरोग्‍य तपासणी शिबीरे आयोजित करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक न्‍याय राज्‍य मंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुरेश कांबळे, आदित्‍य माळवे, कमलेश चासकर, अभय सावंत, कार्तिकी हिवरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.