करमाळा विधानसभेचं शिवधनुष्य कुणाच्या खांद्यावर? बागल की पाटील; नेत्यांची धाकधुक वाढली

करमाळा/गौरव मोरे- जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतश्या राजकीय घडामोडी बदलत आहेत. सध्या पक्ष बदलाच्या वा-यामुळे नेते मंडळी जोमात जनता कोमात असून करमाळा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष लागले असून बंडखोरी शक्यता नाकारता येणार नाही.

राष्ट्रवादीच्या माजी आमदार श्यामल बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काल मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

आगामी करमाळा विधानसभेला शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल या खात्रीनेच त्यांचा शिवसेना प्रवेश असल्याचे सध्यातरी चर्चा सुरू आहे. रश्मी बागल शिवसेनेत दाखल झाल्यामुळे सध्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्या गटात खळबळ उडालेली आहे. आमदार पाटील यांचे तिकीट कापून बागलांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा तालुकाभर सुरू असल्यामुळे पाटील गट अस्वस्थ झालेला आहे.

रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदार नारायण पाटील यांचा आवर्जून उल्लेख केल्यामुळे शिवसेनेची करमाळा विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

सध्या युतीच्या नीतीवर खूप काही अवलंबून आहे, युती तुटली तर आमदार पाटील हे भाजप मधून लढतील अशी चर्चा आहे. कारण अकलूजचे मोहिते-पाटील सध्या भाजप मध्ये असून मोहिते-पाटील आणि आमदार पाटील यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. २०१४ विधानसभेला त्यांना चांगली मदत मोहिते-पाटलांनी केली होती. युती तुटली आणि आमदार पाटील भाजप मध्ये गेलेतर रश्मी बागलांचा शिवसेनेचा मार्ग मोकळा होईल.

दुसरीकडे युती झाली तर करमाळ्याची जागा ही शिवसेनेची असून सध्या आमदार नारायण पाटील आणि दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या रश्मी बागल यांच्या पैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. गेल्या पाच वर्षात विकास कामे पाहिली तर आमदार पाटील यांचे पारडे सध्यातरी जड आहे उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे आमदार पाटील सांगत आहेत तर दुसरीकडे रश्मी बागल ह्या उमेदवारी मिळणार ह्या खात्रीनेच शिवसेनेत आल्या असल्याचे चर्चा आहे.

शिवसेनेची उमेदवारी आमदार पाटील यांना मिळाली तर रश्मी बागलांची अडचण होणार आहे ऐनवेळी त्यांना अपक्ष लढावे लागेल नाहीतर आमदार पाटलांना पाठिंबा द्यायची वेळ येऊ शकते तर रश्मी बागल यांना उमेदवारी मिळाली तर आमदार पाटील यांची अडचण होणार आहे. त्यामुळे आमदार पाटलांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

एकदंरीत पाहिले तर विधानसभेचं शिवधनुष्य कुणाच्या खांद्यावर येणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी तालुक्यात प्रचंड उत्सुकता वाढलेली आहे.

महत्वाच्या बातम्या