पक्षातील स्पर्धक संपवल्यानेचं देवेंद्र फडणवीस पडले एकाकी…

अभिजीत दराडे  : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी जाहीर झाले. हरियाणात निकाल लागल्यानंतर भाजपने अवघ्या दीड दिवसात नवे सरकार स्थापन केले. मात्र, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा घोळ कायम आहे.

मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाच्या शिवसेनेच्या मागणीवरून राज्यात सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. हा पेच सुटावा म्हणून दिल्लीतील भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. शिवसेनेशी संवाद साधण्याबाबत भाजपचे सर्वोच्च नेते उदासीन असल्याने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्याचे चित्र आहे.

निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र भाजपात ‘सबकुछ फडणवीस’ असे एकंदरीत चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रंगवले होते. तिकीट वाटपात एकनाथ खडसे यांना डावलले आणि त्यांच्या मुलीचा पराभव केला. तर विनोद तावडे यांना देखील उमेदवारीपासून वंचित ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार असणाऱ्या पंकजा मुंडे यांचा परळी मध्ये त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून या पराभवाचे खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्यात आले. एवढेच नाही तर धनंजय मुंडे यांना विजयसाठी फडणवीस यांनीच रसद पुरवल्याचा आरोप देखील मुंडे समर्थक करत आहेत. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते नितीन गडकरी युतीमधील पेचाबाबत मौन पाळून आहेत. तर निवडणुकीत तिकीट नाकारल्याने एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पराभवामुळे पंकजा मुंडे सध्या पक्षातील घडामोडींपासून अंतर राखून आहेत.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना अतिआत्मविश्वास होता का ? , पक्षातील मोठ्या नेत्यांना घरी बसवून त्यांनी पक्षाच्या पायावर धोंडा पडून घेतला ? असे प्रश्न ओघाने विचारले जाऊ लागले आहे.

महत्वाच्या बातम्या