नांदेडच्या उमरी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकास मारहाण, गुन्हा दाखल

medical superintendent

नांदेड : जिल्ह्यातील उमरी ग्रामीण रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या एका वैद्यकीय अधीक्षकास रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.१३) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर चव्हाण आपली सेवा बजावत असताना तालुक्यातील दुर्गानगर येथील एक महिला रुग्ण उपचारासाठी दाखल झाली होती. यावेळी उपस्थित डॉ.चव्हाण यांनी या रुग्णावर उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला जाण्याचा सल्ला देऊन रेफर लेटर दिले. तसेच लवकर रुग्णवाहिका बोलवण्याची सूचना नातेवाईकांना केली होती. याच दरम्यान, रुग्णालय परिसरात डॉ.चव्हाण हे उभे असता बोलत बोलत या रुग्णाचे नातेवाईकांनी जवळ येऊन त्यांना मारहाण केली.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी धाव घेताच मारहाण करणाऱ्या त्या रुग्णाच्या नातेवाईकाने तिथून पळ काढला. या घटनेचा रुग्णालयातील संपूर्ण डॉक्टरांनी निषेध करत थेट पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी रुग्ण सेवा केली. तरी देखील असे प्रकार घडत असल्याने डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या