एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्राचार्याकडूनचं मारहाण ?

mgm journalisam collage

औरंगाबाद- औरंगाबादमधील एम.जी.एम.महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला प्राचार्या आणि एका पत्रकाराने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भरत जनार्धन कोल्हे असं या विद्यार्थ्याचं नाव असून एम.जी.एम.महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. एका मुलीला मेसेज करण्याच्या प्रकरणातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात एम.जी.एम. पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखा शेळके आणि पत्रकार कृष्णा केंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोशल मिडीयावर या प्राचार्यांच्या विरोधात तसेच या दोन्ही पत्रकारांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

Loading...

एम.जी.एम. पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखा शेळके यांचीही बाजू आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना त्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा केला. गेट बाहेर काय झालं याबद्दल मला माहिती नाही तसेच पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करू असं सांगितलं. दत्ता कानवटे याच्याबद्दलची माहिती मी पोलिसांना देईन असं देखील त्या म्हणाल्या.

पत्रकार दत्ता कानवटे यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला यावेळी संबधित मुलगी कोण हेच  मला माहित नाही तसेच भरतला मारहाण झाली की नाही हे देखील ठाऊक नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझा या प्रकरणाशी काडीचाही संबध नाही. माझं या प्रकरणामध्ये विनाकारण नाव गोवण्यात येत असून एका बहुजन पत्रकाराला बाजूला सारण्याचा डाव असल्याचा आरोप कानवटे यांनी केला आहे.

या सर्व प्रकारावर आम्ही पत्रकार कृष्णा केंडे यांच्याशी संपर्क साधला असता, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं त्यांनी सांगितले. पत्रकार दत्ता कानवटे याला महाविद्यालयात गेस्ट लेक्चरर म्हणून मीच त्याचं नाव सुचवलं होत. हिच माझी सर्वात मोठी चूक असल्याचं त्याने म्हटलं आहे. मी संबधित मुलीला आणि त्या  विद्यार्थ्याला प्रथमच भेटलो असल्याचा दावा त्यांनी केला. कोणत्याही पोलीस चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचं देखील केंडे यांनी स्पष्ट केलं.

भरत जनार्धन कोल्हे यांचा तक्रार अर्ज सद्या सोशल मिडिया वर व्हायरल होत आहे

दिनांक : 31-05-2018

प्रति,

मा. पोलीस आयुक्त साहेब,

पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद.

विषय : गुन्हा नोंद करणे बाबत.

अर्जदार : भरत जनार्धन कोल्हे

महोदय,

वरील विषयास अनुसरून विनंतीपूर्वक तक्रार अर्ज सादर करतो. मी भरत जनार्धन कोल्हे वय 26, धंदा-शिक्षण, मूळ गाव रा.खादगाव, ता.पैठण जि. औरंगाबादचा असून सध्या शिवशंकर कॉलनी, सिडको N-6, औरंगाबाद येथे राहत वास्तव्यास आहे. मी एम.जी.एम पत्रकारिता महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. दिनांक 16/05/2018 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एम.जी.एम. पत्रकारिता महाविद्यालयाचे प्रोफेसर दत्ता कानवटे यांनी मला “पार्टी दे”, असं म्हटले. त्यानुसार मग आम्ही औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरातील ‘हॉटेल औरंगाबाद’ येथे गेलो. हॉटेलमध्ये आमचे जेवण चालू असताना माझी नजर चुकवून दत्ता कानवटे यांनी माझ्या मोबाईलवरून व्हाट्सअपद्वारे एम.जी.एम. महाविद्यालयातील एका मुलीस मेसेज पाठवले.

या मेसेजचा आधार घेऊन एम.जी.एम. पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखा शेळके यांनी दिनांक 17/05/2018 रोजी 1 वाजेच्या सुमारास मला एम.जी.एम. महाविद्यालय परिसरात असलेल्या त्यांच्या घरी बोलवून घेतले. आणि वर नमूद केलेल्या मेसेजविषयी मला जाब विचारला. नंतर मी मॅडमला सांगितलं की, ‘हे संदेश मी पाठवलेले नसून दत्ता कानवटे यांनी माझी नजर चुकवत माझ्या मोबाईलचा गैरवापर करून सदरील मुलीस मेसेज पाठवले आहेत.’ त्यानंतर शेळके मॅडम यांनी दत्ता कानवाटे आणि ए.बी.पी. माझा या वृत्तवाहीनीचा औरंगाबाद प्रतिनिधी पत्रकार कृष्णा केंडे यांना घरी बोलावले. दत्ता कानवटे यांना सदरील मेसेज संदर्भात शेळके मॅडम यांनी जाब विचारला असता, दत्ता यांनी ‘सदरील मेसेज मी भरत कोल्हे यांच्या मोबाईलवरून केले असून त्यात भरत कोल्हे यांची काहीही चूक नाहीये’ असं लेखी लिहून दिलं. या उपरही माझ्या मोबाईलचा गैरवापर करून हि सगळी घटना घडल्यामुळे मी सदरील मुलीची माफी मागावी असे शेळके मॅडम यांनी सुचवले. त्यामुळे मी सदरील मुलीची माफिदेखील मागितली. एवढे सगळे झाल्यानंतरहि मला तिथे उपस्थित असलेल्या ए.बी.पी. माझा चा पत्रकार कृष्णा केंडे याने लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.

सदरील पत्रकाराचा एम.जी.एम. महाविद्यालय परिसरात येऊन मला मारहाण करण्याचा काहीही संबंध नसताना त्याने मला बेदम मारहाण केली. त्याचप्रमाणे, “मी पत्रकार आहे, माझ्या ओळखी खूप मोठ्या आहेत, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस, परत जर औरंगाबाद मध्ये दिसलास तर तुझे पाय तोडीन. तसेच तू कुठेही गेलास तरी पोलीस तुझी तक्रार घेणार नाहीत. तुला जे करायचं ते कर”, असे म्हणत कृष्णा केंडे याने मला परत लाथा बुक्यांनी मारले. त्याचप्रमाणे शेळके मॅडमयांनीसुद्धा मला मारहाण केली. तसेच जातीवाचक शिविगाळही केली. हे सर्व झाल्यावर मी तिथून बाहेर निघत असताना शेळके मॅडम आणि कृष्णा केंडे याने केलेल्या मारहाणीमुळे बेशुद्ध पडलो. काही मित्रांनी मला एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सुमारे अडीच तासानंतर मी शुद्धीवर आलो. डॉक्टरांनी मला, ‘तुझ्या डोक्यावर किंवा कानावर कुणी मारलं का’ असं विचारलं. मी कृष्णा केंडे आणि शेळके मॅडम यांनी मला मारहाण केल्याचे डॉक्टरांना सांगितलं. मला मारहाण झाल्याची MLC डॉक्टरांनी दिली. मी हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर मला पुन्हा शेळके मॅडम यांनी निरोप देऊन त्यांच्या घरी बोलावून घेतले. तिथे कृष्णा केंडेही उपस्थित होता. ‘तू आमच्या विरोधात MLC दाखल करतो काय. आमच्या ओळखी खूप मोठाल्या आहेत. तू आमचं काहीही वाकडं करू शकत नाहीस हे लक्षात ठेव.’ असं मला शेळके मॅडम यांनी धमकावलं. त्यानंतर कृष्णा केंडे यानेही, ‘पोलीस आमचं काही वाकडं करू शकत नाहीत. तुझी तक्रार पण ते दाखल करून घेणार नाहीत.’ अस म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आणि मला तिथून हाकललं.

या प्रकारामुळे माझं मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे मी प्रचंड तणावाखाली होतो. शेवटी मी पोलिसात तक्रार देण्यासाठी दि.१९-५-२०१८ रोजी N-7 सिडको पोलीस ठाण्यात गेलो असता, मला तिथे दिवसभर बसून ठेवण्यात आले. तसेच तक्रार दाखल करून घेण्याविषयी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. शेवटी कंटाळून मी घरी गेलो आणि परत दुसर्या दिवशी दि.२०-५-२०१८ रोजी सदरील पोलीस स्टेशनला गेलो असता मला आदल्या दिवशीप्रमानेच तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. महाविद्यालयातील मारहाणीमुळे आणि पोलिसांनी दिलेल्या अश्या वागणुकीमुळे मी पूर्णतः मानसिक तणावाखाली गेलो. शेवटी मी धैर्य करून आता शेवटची आशा म्हणून मा.आयुक्त साहेब तुमच्याकडे न्याय मागत आहे.

महोदय, शिक्षण संस्था आणि शिक्षक विद्यार्थी घडवण्याचे काम करतात. परंतु एम.जी.एम. च्या प्राचार्य रेखा शेळके यांनी बाहेरील पत्रकार गुंड बोलावून मला मारहाण केली आणि पवित्र अश्या शिक्षण क्षेत्राला काळिमा फसला. त्याचप्रमाणे स्वतःला लोकशाहीचा चौथा खांब म्हणवणाऱ्या कृष्णा केंडे या पत्रकारानेही मला मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मा.आयुक्त साहेब या प्रकाराला सत्तेचा गुर्मी नाही म्हणत तर आणखी काय म्हणता येईल. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला अश्या हुकुमशाही आणि सत्तेची गुर्मी असणार्या माणसांकडून अशी वागणूक भेटते हे दुर्दैवी आहे. त्याचप्रमाणे यासाठी न्याय मागायला गेल्यावर आपले पोलीस खातेही आम्हाला सोयीस्करपणे उडवून लावते हे जास्त दुर्दैवी आहे. अश्यावेळी आम्ही न्याय मागायचा तरी कुणाकडे, हा यक्षप्रश्न माझ्यापुढे आहे.

सध्या मी प्रचंड मानसिक तणावाखाली असून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी एम.जी.एम. पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके आणि ए.बी.पी. माझा या वृत्तवाहिनीचा औरंगाबादचा प्रतिनिधी कृष्णा केंडे हे दोघेजण जबाबदार असतील. मी मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे तक्रार दाखल करत आहे. तरी माझ्या तक्रारीचा विचार करून रेखा शेळके आणि कृष्णा केंडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्वसामान्य माणसाचा पोलीस खात्यावरील विश्वास कायम ठेवावा हि विनंती. या अर्जासोबत MLC ची प्रत जोडत आहे. मला न्याय मिळावा हीच आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद.

आपला विश्वासू

भरत जनार्धन कोल्हे.

 

 

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...