तर रस्त्यावर उतरण्याऐवजी सन्मानानं पराभव मान्य करा – अश्विनी भिडे

टीम महाराष्ट्र देशा : काही लोक स्वत:ला न्यायायलापेक्षा उच्च समजतात. या लोकांचं वागणं बेकायदेशीर असून तुम्ही कोर्टात लढाई हरला असाल तर रस्त्यावर उतरण्याऐवजी सन्मानानं पराभव मान्य करा,’ अशी टीका मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ट्वीटरवरून केली आहे. आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर शुक्रवारी (ता. ५) झाडे तोडण्यात आली. त्यानंतर याविरोधात ट्विटवर कालपासून #AareyForest हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला आहे.

आरे येथील मेट्रोच्या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका दाखल करण्यात आली होती. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावत राज्य सरकार आणि मुंबई रेल मेट्रो कॉर्पोरेशनला झाडे तोडण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री आठपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर भिडे यांनी खोटी माहिती पसरवली जात असून न्यायलयीन लढाई हारलेल्यांनी पराभव स्वीकारावा असा सल्लाही दिला आहे. दरम्यान मेट्रो प्रशासनाने सुरु केलेल्या वृक्षतोड मोहिमेत काही तासांमध्ये २०० हून अधिक झाडे कापण्यात आली आहेत. पर्यावरणप्रेमींनी रात्री आरेमध्ये आंदोलन सुरु केले आहे.

‘न्यायालयाच्या निर्णयानंतर झाडे तोडण्यासाठी १५ दिवसांची पूर्वसूचना देणे गरजेचे आहे अशी खोटी माहिती पसरवली जात आहे. ही माहिती चुकीची आहे. वृक्ष प्राधिकरणाने १३ सप्टेंबर रोजी नोटीस दिली होती. यानंतरचे १५ दिवस २८ सप्टेंबर रोजी संपले. त्यामुळे न्यायलयाच्या निर्णयाची वाट पाहिली जात होती. न्यायलयाने सर्व याचिका फेटाळल्या आहेत. मात्र तरीही काही लोक स्वत:ला न्यायायलापेक्षा उच्च समजतात. या लोकांचं वागणं बेकायदेशीर असून तुम्ही कोर्टात लढाई हरला असाल तर रस्त्यावर उतरण्याऐवजी सन्मानानं पराभव मान्य करा,’ असे ट्विट भिडे यांनी केले आहे.