अश्विनने तोडला 37 वर्षांपूर्वीचा विक्रम

पुणे- भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने पुणे येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशी मायदेशात कसोटीत एका वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम नोंदविला. अश्विनने मिचेल स्टार्कला बाद करत या सीजनमधील 64वी विकेट घेतली. या विकेटसह त्याने कपिल देव यांना मागे टाकत त्यांचा 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
कपील देव याने 1970-80च्या सीजनमध्ये 13 कसोटी सामन्यात 63 विकेट घेतल्या होत्या. तर अश्विनने आतापर्यंत 10 कसोटी सामन्यात 24.39च्या सरासरीने 64 विकेट घेतल्या आहेत. मायदेशी कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणार्‍या भारतीयांच्या यादीतही अश्विनने तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्याने 2012-13मध्ये 10 कसोटी सामन्यात 61 विकेट घेतल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर 9 कसोटी सामन्यात 54 विकेट घेणारा अनिल कुंबळे हा आहे. रवींद्र जडेजा या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने 10 कसोटी सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर बिशन सिंह बेदी असून त्यांनी 8 सामन्यात 47 विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी मालिकेच्या समाप्तीपर्यंत अश्विन सर्वाधिक विकेट मिळविण्याचा नवीन विक्रम नोंद करू शकतो. तसेच रवींद्र जडेजाही या यादीत आपले स्थान वरच्या क्रमांकावर नेऊ शकतो.