अष्टविनायक : मोरगावच्या गणपतीला मयुरेश्वर का म्हणतात ?

morgav moreshwar ganpati

निजे भूस्वानंद जडभरत भूम्या परतरे।
तुरीयास्तीरे परमसुखदेत्व निवससि ॥
मयुराया नाथ स्तवमसिच मयुरेश भगवान ।
अतस्त्वा संध्याचे शिवहरिरणी ब्रह्मजनकम ॥१॥

अष्टविनायकांमधील प्रमुख असणाऱ्या मयुरेश्वर मोरयाच्या मंदिरात प्रवेशद्वारावर वरील श्लोक लिहिलेला आपल्याला दिसतो. याचा अर्थ आहे “हे मोरगावच्या मयुरेशा, तू जडभरतमुनिच्या भूमीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, कर्‍हा नदीच्या तीरावरील स्वतःच्या अत्यंत सुखदायी क्षेत्रात वास करतोस. निर्गुण, प्रणवाकृती, स्वयंभू, योगाच्या तुरिय अवस्थेत राहिल्यामुळे शिवशंकरांना ब्रह्मानंद देणाऱ्या मयुरेश्वरा, मयुर हे आसन असणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. ब्रह्मदेवाने हे तुझे देवालय उभारले व रक्षणासाठी (दक्षिणेस) शंकर व (उत्तरेस) सूर्य यांना सिद्ध केले.”

शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायकाचे दर्शन करावयाचे असल्यास त्याचा प्रारंभ आणि शेवट हा मयुरेश्वराच्या दर्शनानेच केली पाहिजे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या काठावर मोरगाव हे क्षेत्र वसलेल आहे, एके काळी गावामध्ये खुपसारे मोर होते त्यामुळेच या गावाला मोरगाव असे म्हंटले जात असल्याच बोलल जात. पुणे सोलापूर पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून ५६ कि.मी. वर चौफुला फाट्यावरून उजवीकडे नीरामार्गावर मोरगाव क्षेत्र आहे.

श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. मोरेश्वराची मूर्ती अतिशय सुंदर असून डाव्या सोंडेची आणि उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन बसलेल्या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. तर मोरेश्वराच्या भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी- सिद्धी आहेत. निस्सीम गणराय भक्त मोरया गोसावी यांनी मोरेश्वराच्या पूजेचा वसा घेतला होता. श्री समर्थ रामदास स्वामींना ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती याच मंदिरात स्फुरल्याची आख्यायिका आहे. सध्याची मूर्ती हि मूळची नसल्याच सांगितल जाते. खरी मूर्ती रत्नांचा चुरा, लोह आणि माती यांनी बनवलेली असून ती दृश्य मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे. स्वतः ब्रह्मदेवानेच या मूर्तीची स्थापना केली होती.

मंदिराची आख्यायिका
पूर्वी मिथिल देशामध्ये गंडकी नामक नगरीत महापराक्रमी आणि पुण्यवान असा चक्रपाणी नावाचा राजा होऊन गेला. त्याचा सिंधू नावाचा पुत्र झाला. पुढे राजकुमार सिंधू मोठा झाल्यावर त्याने दैत्य गुरू शुक्राचार्याच्या आदेशानुसार दोन हजार वर्षे सूर्योपासना केली. पुढे राजा चक्रपाणी सर्व राज्य सिंधूस सोपवून वनवासात गेला. सिंधू दिग्विजयाच निघाला. त्याने प्रथम पृथ्वी जिंकली. पुढे इंद्राचा पराभव आणि आपल्या पराक्रमाने भगवान विष्णूलाही वश केले. हळूहळू सर्व देवांवर विजय मिळवत सर्वाना आपल्या कैद खाण्यात बंधिस्त केले. सिंधुराजाने सत्यलोक व कैलासाकडे आपली दृष्टी वळवल्यावर मात्र सर्व देवगण दुःखी झाले. देवांनी आपला अधिपती गणेशाची प्रार्थना केली. श्रीगजाननाने पार्वतीच्या पोटी अवतार घेतला. आणि मोरावर बसून त्याने सिंधूशी युद्ध केले. युद्धात सिंधूचा वध केला. तेव्हापासून मोरगावच्या गजाननाचे नाव मयुरेश्वर अथवा मोरेश्वर असे पडले.