‘विजय शिवतारे या पोपटाला पिंजऱ्यात बंद करून लांब नेवून सोडायची वेळ आली आहे’

टीम महाराष्ट्र देशा : अटीतटीचा सामना रंगलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादीने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभांचा धडाका लावला आहे. बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज जेजुरीमध्ये सभा पार पडली. यावेळी पुरंदर माजी आमदार अशोक टेकवडे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. टेकवडे यांनी राज्यमंत्री शिवतारे यांचा उल्लेख पोपट असा केला असून या पोपटाला आता लांब नेवून सोडायची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

यावेळी टेकवडे म्हणाले की, पुरंदरमधील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मतभेद संपले आहेत. त्यामुळे आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येवून सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम करून त्यांना पुरंदर मधून लीड मिळवून दिला पाहिजे, विजय शिवतारे या पोपटाला निवडणुकीच्या पिंजऱ्यात बंद करून लांब नेवून सोडला पाहिजे. तसेच शिवतारे यांनी गेल्या १० वर्षातील विकास काम दाखवावी, असे आव्हान देखील त्यांनी केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार , संजय जगताप , अशोक टेकवडे , विजय कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा राष्ट्रावादी कॉंग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत, तर भाजपकडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला सुळे यांना सोपी वाटणारी निवडणूक आता अटीतटीची बनली आहे.