अन् ‘अशोकराव’ यांना लागले ‘आमदारकी’चे वेध !

blank

निलंगा/प्रा.प्रदीप मुरमे : राजकारणात प्रत्येकालाच ‘आमदारकी’चे स्वप्न खूणावत असते. याला निलंगा येथील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर देखील अपवाद नाहीत. मागची विधानसभा निवडणूक त्यांनी लढविली होती.परंतु निवडणूकीत त्यांचा पराभव झाल्याने त्यावेळी आमदारकीने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली. त्या पराभवाने थोडे देखील ना उमेद न होता पुतणे संभाजीराव पाटील यांच्याकडून झालेला पराभव त्यांनी दिलदारपणे मान्य करुन पचविला ! पराभवानंतरही जनतेशी असलेला संपर्क कायम ठेवून आहेत. परंतु विधानसभा निवडणूक अवघ्या एका वर्षावर आल्याने मागील काही दिवसापासून त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागात संपर्क चांगलाच वाढविला आहे. लग्नसमारंभ,वाढदिवस,दाळ पार्टी,सांत्वन आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सातत्याने मतदारसंघात संपर्कात व चर्चेत आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणूक कोणत्याही परीस्थितीत निवडणूक जिंकायची असा चंग बांधला असल्याचे बोलले जाते .या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूकीची त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे चिञ मतदारसंघात पाहायला मिळत आहे.त्यामुळे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जनतेशी संपर्क करत असून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. या अनुषंगाने अशोकराव पाटील यांच्या नावाची तालुक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ऐकावयास येत आहे, हे माञ निश्चित !