fbpx

कॉंग्रेसने विश्वासघात केला, पराभवानंतर अशोक जगदाळे यांची संतप्त प्रतिक्रिया

congress ncp

टीम महाराष्ट्र देशा- बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने फटकारल्यानंतर आज तातडीने मतमोजणी घेण्यात आली आहे. अटीतटीच्या लढाईत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये अखेर धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. या पराभवानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे.

पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांनी पराभवाचे खापर कॉंग्रेसच्या माथी फोडले आहे. राष्ट्रवादीने ताकद लावली, मात्र काँग्रेसने विश्वासघात केला असा गंभीर आरोप जगदाळे यांनी केला आहे. कॉंग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचं देखील निकालानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक पहिल्यापासूनच चुरशीची राहिली होती. सर्वप्रथम अधिकृत उमेदवार कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा दणका बसला होता. त्यानंतर आता धस यांच्या विजयाने विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना बहीण पंकजा मुंडे आणि धस यांनी धोबीपछाड दिल्याचं बोललं जातं आहे. मताची आकडेवारी कमी असताना देखील काँग्रेस – राष्ट्रवादीची मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. दरम्यान धस यांना 526 मत, जगदाळे यांना 452 , 1 मत नोटाला तर 25 मते बाद झाली.

उस्मानाबाद– बीड – लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या वतीने प्रथम भाजपाचे रमेश कराड यांना पक्षात प्रवेश देवून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. परंतू रमेश कराड यांनी आपला अर्ज ऐनवेळी मागे घेतल्याने राष्ट्रवादी तोंडावर पडली होती. नंतर ज्या उमेदवारास पक्षाने उमेदवारी नाकारली होती अशा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार असलेल्या अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले होते तसेच जगदाळे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने आपली पुर्ण शक्ती पणाला लावली होती. विशेषतः विधानपरिषेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जगदाळे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. मात्र सुरेश धस यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. सुरेश धस यांच्या विजयामुळे ग्रामविकास मंत्री तथा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे पक्षातील स्थान मजबूत झाले आहे.

1 Comment

Click here to post a comment