अशोक गेहलोतांचा शपथविधी, सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

टीम महाराष्ट्र देशा – अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल कल्याण सिंह यांनी या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. राजस्थानचे २२वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. जयपूरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

अशोक गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. शपथविधी सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जतीन प्रसाद इत्यादी कॉंग्रेस नेत्यांची उपस्थिती होती. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, राजदचे नेते तेजस्वी यादव, शरद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, फारुक अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, जीतनराम मांझी आणि डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टालिन हे सर्वपक्षीय नेतेही व्यासपीठावर उपस्थित होते.