मनसेला महाआघाडीत स्थान नाही,संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊ : चव्हाण

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ही भेट कौटुंबिक कारणासाठी घेतल्याचा दावा केला जात असला तरीही या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेला महाआघाडीत समावून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत स्थान नसेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. मनसे महाआघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र कॉंग्रेसने मनसेला आघाडीत घ्यायला तीव्र विरोध केला आहे. आघाडी मूलभूत विचारसरणीच्या आधारावर उभी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे का, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत स्थान नसेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, संभाजी ब्रिगेडची काँग्रेसला पाठिंबा देण्याची इच्छा आहे.त्यांनाही सोबत घेऊ असं विधान मनसेला आघाडीत घ्यायला विरोध करणाऱ्या चव्हाणांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीला १२ जागा देणे शक्य नाही. पण आम्ही योग्य जागा सोडू. शिवाय, सीपीआय, सीपीएम, राजू शेट्टी, कवाडे यांची आरपीआय यांसारख्या ७-८ पक्षांशी आमची बोलणी झाली असल्याचं देखील चव्हाण म्हणाले.